चोरीच्या मोटरसायकली विकायला आलेले चोरटे जेरबंद: नारायणगाव पोलिसांची कारवाई

नारायणगाव :- (किरण वाजगे)

जुन्नर येथे चोरी केलेल्या मोटर सायकलची विक्री करण्यासाठी नारायणगाव येथे आलेल्या दोन मोटार सायकल चोरांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

युवराज अनिल वाघमारे (वय २१ वर्ष राहणार निरगुडे ता जुन्नर जि पुणेव गणेश रामदास मुळे (वय ४० वर्ष राहणार गुंजाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि २७ जुलै रोजी नारायणगाव एसटी स्टँड येथे दोन इसम हे चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पो. निरिक्षक ताटे यांनी लागलीच पोलीस पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रवाना केले.

मिळालेल्या बातमीच्या आधारे व वर्णनानुसार दोन इसम हे एक मोटर सायकल घेवून एसटी स्टँड आवारात आले असता पोलीस पथकाने सापळा रचून त्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असणारे मोटरसायकल बाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटार सायकल ही जुन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली. सदर गाडीची पाहणी करता तिचा आर टी ओ नंबर एम एच १४ यु १८४८ असा असून ती जुन्नर येथील पुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथून चोरी केल्याचे सांगितले. याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपींना मोटर सायकलसह जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे, पो.उप. निरिक्षक धनवे, पो.ना. पालवे,पो. कॉ. कोबल, वाघमारे, कोळी, ढेंबरे, तांबे यांच्या पथकाने केली.

Previous articleहॅप्पी गुप्रच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत
Next articleस्वतःच्याच घरात गिऱ्हाईकांना बोलावून महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी घेतले ताब्यात