शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या : नारायणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी शिवीगाळ, मारहाण , टोमणे मारून मानसिक त्रास दिल्याने नारायणगाव खोडद रोडला राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केली आहे.

अनिता संभाजी पडवळ (वय ४५ वर्षे ) असे जीव गमावलेल्या महिलेचे नाव असून नारायणगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रविण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व रा.अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी खोडद रोड नारायणगाव ता. जुन्नर जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विशाल संभाजी पडवळ (वय २५ वर्षे रा अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी खोडद रोड नारायणगाव) याने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याची आई अनिता हे नारायणगाव येथे खोडद रोडवर अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी राहतात त्यांच्या शेजारी दुशिंग आडनावाचे कुटुंब राहत असून फिर्यादीमध्ये नमूद नावे असणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादी विशालची आई अनिता हिस दि १८ ते २४ जुलै दरम्यान वेळोवेळी टोमणे मारणे, मारहाण, शिवीगाळ तसेच दमदाटी करून वेळोवेळी आई अनिता हीस मानसिक त्रास दिल्याने त्यांचा त्रास असह्य झाल्याने आई अनिता हीने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून कंटाळून घरांमध्ये कुणाला काही एक न सांगता घरातून निघून जाऊन पाटे खैरे मळा येथील एका विहिरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस दुशिंग कुटुंब जबाबदार असल्याच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे पाटील करीत आहेत.

Previous articleजुन्नर- वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती
Next articleगारवा हॉटेलच्या मालकाची हत्या करण्यात वापरलेल्या तलवारी लपवून ठेवल्या प्रकरणी महिलेला अटक