उरुळी कांचनमधील गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या व्यावसायिक वैमन्यस्यातून झाली असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी ८ जणांना अटक केली आहे. हत्या करणारे दोन जण अद्याप फरार आहेत. या हल्ल्यात रामदास रघुनाथ आखाडे ( वय ३८, रा. दौंड ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. उरुळी कांचन, ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा. सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा.ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सोमवार ( २६ जुलै ) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेले रामा वायदंडे व निलेश आरते ( दोघे रा. हडपसर ) हे फरार आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलैला रघुनाथ आखाडे हे त्यांच्या उरुळी कांचन येथे गारवा हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत बसले होते. त्यावेळी रामा वायदंडे त्यांच्या जवळ आला. व त्याने त्याचे आणलेल्या धारदार तलवारीने डोक्यात जोरदार वार केले. त्यानंतर तो तलवार घेऊन महामार्ग ओलांडुन उरळी कांचन कडे जाणा-या रस्त्यावर पलीकडे गेला. तेथे आरते हा दुचाकी चालू ठेऊन त्याची वाट पाहत होता. दुचाकीवर बसून दोघे जण हडपसर दिशेने निघून गेले.

का झाली हॉटेल व्यावसायिक आखाडे यांची हत्या?

आखाडे यांच्या गारवा हॉटेलचा दररोजचा व्यवसाय सुमारे दोन ते अडीच लाख होता. तर खेडेकर यांच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय ५० ते ६० हजार होता. आखाडे यांचे हॉटेल कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी आपला भाचा सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी त्याला दररोज एक ते दोन हजार रुपये देऊ असे सांगितले. त्यानुसार सौरभ याने त्याचा साथीदार वायदंडे, आरते व इतरांच्या मदतीने खून केला. यांतील बाळासाहेब खेडेकर यांचेसह सौरभ चौधरी, आरते, माने, खडसे व निखिल चौधरी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व उपनिरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.

Previous articleएक वर्षापासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
Next articleलोणी येथे मटका चालवणार्‍यावर कारवाई