पुणे नाशिक रेल्वे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोध

नारायणगाव (किरण वाजगे)

पुणे नाशिक या दोन शहरादरम्यान रेल्वे लाईन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया व जमीन मोजणी सध्या सुरू असून जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

 

 

पुणे नाशिक या दोन मोठ्या शहरांना जोडणारा प्रस्तावित नवीन दुहेरी मध्यम उच्च वेगवान ब्रॉडगेज रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. भू संपादन केल्यानंतर हिवरे तर्फे नारायणगाव येथील सुमारे २७३ शेतकरी बाधित होणार असून सुमारे २४.२५ हेक्टर एवढे क्षेत्र या रेल्वे महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे. हे काम जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांना देण्याचे योजिले आहे.

असे असताना हिवरे तर्फे नारायणगाव येथील बागायती क्षेत्रातून प्रस्तावित रेल्वे लाईन जात असल्यामुळे उर्वरित शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊन त्या क्षेत्रात संबंधित शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य होईल. तसेच शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे उत्पन्नात घट होईल त्याचप्रमाणे काही शेतकरी तर भूमिहीन होतील. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता पाहता या प्रकल्पाला स्थानिक बांधीत शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी मंचर यांच्याकडे नुकताच हरकत अर्ज दाखल केला आहे.

या अर्जावर शिवदास सोपान खोकराळे, अवधूत दत्तात्रेय बारवे, वैभव विठ्ठल शिंदे, सुभाष किसन खोकराळे, संजय दशरथ भोर, विलास बबन खोकराळे आदी शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे.

Previous articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे कामकाज राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालू – खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleबजरंग दल आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचाही उस्फुर्त सहभाग