काळात डिजिटल व ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज-कल्याणराव विधाते

अमोल भोसले,उरुळी कांचन

करोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात डिजिटल व ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज असून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला डिजिटल वर्ग बनवून दिल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत असे मत हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी व्यक्त केले. लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या १९८० सालच्या इयत्ता ४ थीच्या व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलच्या १९८६ सालच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी दिड लाख रुपये खर्च करून या दोन्ही शाळेत प्रत्येकी एक असे दोन डिजिटल वर्ग बनवून दिले आहेत. या दोन्ही डिजिटल वर्गांचे हस्तांतरण कल्याणराव विधाते यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष काळभोर, प्राचार्य एस एम गवळी, केंद्र प्रमुख रोहिदास मेमाणे, तत्कालीन शिक्षकवृंद, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, या बॅचचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

या वेळी बोलताना कल्याणराव विधाते पुढे म्हणाले काळानुरुप शिक्षण पद्धती मध्ये बदल करणे आवश्यक आहे. डिजिटल वर्ग करणे हि काळाची गरज आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी डिजिटल वर्ग करणे ही अतिशय स्तुत्य बाब आहे. जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या पुढील पिढीला देण्याची माजी विद्यार्थ्यांची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. शाळेतील प्रत्येक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी असे काम केले तर सर्वच शाळा आगामी काळात डिजिटल होतील.

यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले जीवनातील प्रत्येक क्षेत्रात डिजिटलायझेन करण्याची गरज आहे. जेवढे डिजिटलायझेशन होणार, तेवढे काम चोख करावे लागणार आहे. कारण ते सगळ्यां पर्यंत पोहचणार आहे. त्यातील चुका समाजाला शोधता येणार आहे, त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे ते काम अभ्यासपूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे. करोनामुळे डिजिटल वर्ग बनवण्याची प्रकर्षाने गरज जाणवत आहे.

यावेळी बोलताना प्राचार्य एस एम गवळी म्हणाले आमची शाळा ग्रामीण भागात असून समाजाच्या विविध स्तरांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. या शाळेत जनसामान्य व गोरगरीब पालकांची मुलं शिकतात. त्यांना बदलत्या काळाच्या बरोबरीने शिक्षण मिळावं या हेतूने माजी विद्यार्थ्यांनी केलेला उपक्रम अनुकरणीय आहे. एका बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हे डिजिटल वर्ग दिल्याची प्रेरणा अनेक माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शाळेचे रुप बदलायला वेळ लागणार नाही.

कार्यक्रम सुरु होताना शाळेची प्रार्थना व संपताना राष्ट्रगीत झाले, त्यामुळे ३५ वर्षानंतर दहावीचा वर्ग परत एकदा भरल्याची भावना सर्व विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली. ३५ वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी व शिक्षक भेटल्यामुळे सर्व आनंदीत झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील व शिक्षकांनी त्यावेळी शिकवताना आलेले कडू गोड अनुभव सांगितले. त्यामुळे अधुन मधुन हास्याची कारंजी उडत होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या तत्कालीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सुभाष काळभोर, तत्कालीन शिक्षक खोत सर, पोमण सर, माने सर, नदाफ सर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर कुमावत यांनी तर सूत्रसंचालन कल्पना मुळे बोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सूर्यकांत गवळी यांनी मानले.

Previous articleसागर गावडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव रत्न पुरस्कार प्रदान
Next articleरोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे