खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने १२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रूपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

राजगुरूनगर- खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकनेते शरदरावजी पवार यांच्या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सावित्रीबाई फुले, शारदाबाई पवार, साहेबराव बुट्टेपाटील आणि दत्तात्रेय वळसेपाटील यांच्या नावाने गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला. या माध्यमातून मागील दोन वर्षातील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड  देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक कोंडीभाऊ टाकळकर,  बाळासाहेब सांडभोर,  लालचंद कर्नावट, ॲड. माणिक पाटोळे, सुभाष टाकळकर, प्राचार्य डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.

या शिष्यवृत्तीसाठी गुणवंत परंतु आई-वडील नसलेले,  मागास प्रवर्गातील, आदिवासी, अंध-अपंग, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत ४६ विद्यार्थिनींना सुमारे २ लाख ९२ हजार रु., शारदाबाई पवार शिष्यवृत्ती अंतर्गत ४५ विद्यार्थिनींना सुमारे ३ लाख १८ हजार,  साहेबरावजी बुट्टेपाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना ९२ हजार तसेच  दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना सुमारे  १ लाख ३० हजार असे एकूण ८ लाख ३३ हजार रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ८ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नुकतेच सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर पिंगळे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत अकौन्टसी विषयात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी आकांक्षा वाडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी  शिष्यवृत्तीसाठी ठेव स्वरूपातील आर्थिक मदतीबद्दल लोकनेते शरदरावजी पवारसाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. खेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आणि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते या भावनेतून संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांची निवड पारदर्शकपणे केली असल्याचे सांगितले. या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारणासाठी करावा अशी सूचना केली. तसेच शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या जीवनात यशस्वी झाल्यावर सामाजिक योगदानाची भावना कायम मनात जपून ठेवावी असे आवाहन केले.

 या प्रसंगी ॲड. माणिक पाटोळे,  प्राचार्य डॉ. व्ही.डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे,  धर्मराज पवळे, सी.ए. सागर पिंगळे, आकांक्षा वाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी तर आभार प्रा. एस. एन. टाकळकर यांनी मानले.

Previous articleपारगाव शिंगवेत मटका चालवणार्‍यावर कारवाई
Next articleमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब काळोखे यांची नियुक्ती