अधिकृत उद्घाटन व्हायच्या आधीच नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

नारायणगाव (किरण वाजगे) पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आज नारायणगाव येथे सायंकाळी अचानक करण्यात आले.

या रस्त्याचे तसेच राजगुरुनगर येथील घाटाच्या बाह्यवळण घाटरस्त्याचे उद्घाटन उद्या शनिवार दिनांक १७ जुलै रोजी विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, तसेच आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते अधिकृतरित्या होणार आहे.

मात्र आज सकाळपासून सोशल मीडियावर कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे पोस्टर्स व मेसेजेस प्रसारित करण्यात आले, त्यावर केवळ राष्ट्रवादीच्याच नेतेमंडळींचे फोटो आणि नावे असल्यामुळे व संभाव्य उद्घाटन करताना महाआघाडीचा धर्म न पाळल्यामुळे शिवसेना जुन्नर तालुका व जुन्नर आंबेगाव खेड येथील शिवसैनिकांच्या वतीने आज शुक्रवार (दि. १६) रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच डफ ताशा यांच्या निनादात जोरदार उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, भाजपचे जयसिंग एरंडे, माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोर, माजी उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, राजाराम बाणखेले, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रवींद्र करंजखेले, शरद चौधरी, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, सुरेश घुले, बबलू काजळे, माजी सरपंच रामदास बाळसराफ, गौतम औटी, अभय वाव्हळ, संतोष दांगट अरिफ आतार, तसेच युवा सेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी व शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करत खासदार कोल्हे यांचे एक रुपयाची तरी योगदान या कामात आहे का तसेच आपण केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मी सातत्याने पाठपुराठा केल्यामुळे हे दोन्ही बाह्यवळण रस्ते सुरू झाले आहेत. तसेच विद्यमान खासदार केवळ बोलण्यात पटाईत असून लोकसभा मतदारसंघात ते वेळ देऊ शकत नसल्याचीही त्यांनी टीका केली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, भाजपचे जयसिंग एरंडे, यांनी तीव्र भाषेत राष्ट्रवादीच्या खासदार आमदारांचा निषेध व्यक्त केला. उद्घाटन केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम जाणाऱ्या वाहनचालकांना पेढे वाटून गुलाब पुष्प देण्यात आले.

Previous articleआघाडीची व युतीची चिंता न करता कामाला लागा – शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे
Next articleनारायणगाव येथे रेडिमेड कपड्याच्या गोदामाला आग:पंचवीस लाख रुपयांचा ऐवज आगीत खाक