कोहिनूरच्या आटा चक्कीच्या नावाने बनावट आटा चक्कीची विक्री करणाऱ्या अकोले येथील “शेतकरी मशिनरी” या दुकानावर नारायणगाव पोलिसांचा छापा

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)

“कोहिनूर” नावाने बनावट आटा चक्की विक्री करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ‘शेतकरी मशीनरी’ या दुकानावर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून ८ लाख १६ हजार रुपये किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई बुधवार दि.१४ जुलै रोजी अकोले ( ता. अकोले जि. नगर) येथे करण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी बनावट कोहिनूर नावाने आटा चक्की विक्री करणारे शेतकरी मशीनरी अकोले येथील दुकानाचे मालक सुधीर प्रकाश गडाख (वय ३७ रा.संगमनेर जि. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद विनोद सेल्स कॉर्पोरेशन चे मालक पराग अशोककुमार शहा (रा. नारायणगाव ता. जुन्नर) यांनी दिली आहे.

यापूर्वी दिनांक ७ जुलै रोजी बनावट आटा चक्की सील करण्याची पहिली कारवाई नारायणगाव (वारूळवाडी) येथील ‘गडाख मशीनरी’ यांच्या दुकानावर छापा टाकून करण्यात आली होती. त्यावेळी या दुकानात १४ लाख ९७ हजार किमतीच्या १७५ बनावट आटा चक्क्या नारायणगाव पोलिसांनी जप्त केल्या होत्या. गडाख मशीनरीचे मालक सुधीर प्रकाश गडाख यांच्यावर पहिला कॉपीराईट चा गुन्हा दाखल झाला होता. तो बनावट माल नारायणगाव पोलिसांनी जप्त करून बनावट आटा चक्की संदर्भात पुढील तपास सुरु केला असता नारायणगाव पोलिसांना अशाच प्रकारची बनावट आटा चक्कीची विक्री अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सुधीर गडाख यांच्या मालकीचे ‘शेतकरी मशीनरी’येथे होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पो. अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पो निरिक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने बुधवार दि १४ जुलै रोजी छापा टाकून ८,१६,००० किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत.

अशाप्रकारे पुणे जिल्ह्यात किंवा इतरत्र कोणी जर कोहिनूर नावाच्या बनावट आटा चक्क्या विक्री करत असेल तर त्यांनी नारायणगाव पोलिसांना ०२१३२ – २४२०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन साहेब पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.

Previous articleशिक्षणा फाऊंडेशन आणि विभा इंडीया यांच्या वतीने वैद्यकीय साहित्याची मदत
Next articleदौंड पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम