हडसर गडावर गिर्यारोहकांनी अनुभवला खुंटीच्या वाटेचा थरार

राजगुरूनगर-सह्याद्री खोऱ्यात साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचे ठिकाण असणारा, थरारक, मनात धडकी भरवणारा, सर्वसामान्यांचे काळजाचे ठोके चुकवणारा, आरोहणासाठी कठीण असणारा आणि गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा १०० फूटी खुंटीच्या वाटेचा टप्पा पार करीत हडसर गडाचा माथा गाठला.

या मोहिमेची सुरुवात हडसर (ता. जुन्नर, जि.पुणे) येथून झाली. शेतातून जाणारी पाऊलवाट ही थोड्याच वेळात गडावर जाणाऱ्या पाऊलवाटेशी मिळाल्यावर घनदाट जंगलातून खुंटीच्या वाटेच्या पायथ्याला घेऊन जाते.

येथून पुढे आहे ती खुंटीची वाट आणि या मोहिमेचा खरा थरार. या वाटेचा पहिला थरारक आणि सरळसोट ५० फूटी टप्प्याचे आरोहण हे अतिशय आव्हानात्मक आहे. हा टप्पा पार केल्यावर एक छोटी गुहा आहे. या ठिकाणाहून दाव्या बाजूला १० फूट गेल्यावर दुसरा थरारक आणि सरळसोट ३० फूटी आव्हानात्मक टप्पा आहे. येथून दाव्या बाजूला २० फूट गेल्यावर शेवटचा १० फूटी सरळसोट टप्पा पार केल्यावर गडावर पाणी टाकी समूह, देवीचे मंदिर, हनुमान शिल्प आणि चौथरा आहे. हा १०० फूटी टप्पा म्हणजे ९० अंशातील उभी भिंतच.

हा टप्पा खुंटीच्या सहाय्याने मजबूत पकड करून सर करावा लागतो म्हणूनच याला खुंटीची वाट असे म्हणतात. हा खुंटीच्या वाटेचा टप्पा सर करायला मानसिक आणि शारीरिक कणखरता लागते. हाताच्या आणि पायाच्या बोटाची मजबूत पकड करून अरोहण करावे लागते. अतिशय सावधानतेने आणि एकाग्रतेने हा टप्पा पार करावा लागतो.

अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात डॉ. समीर भिसे, शिवाजी जाधव आणि अथर्व शेटे या गिर्यारोहकांनी हा थरारक खुंटीच्या वाटेचा टप्पा सर करीत हडसर गडाचा माथा गाठला.

Previous articleतरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण
Next articleसदाशिव नेवकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घेण्याची गरज – ह. भ. प. सुरेखाताई शिंदे