लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

राजगुरूनगर- लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या पाचवा स्थापना दिन शनिवारी (दि. १०) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शहरातील बारा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचे पालन करून व केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आंतराष्ट्रीय लायन्स क्लबचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रकाश मुटके, क्लबचे अध्यक्ष अंबर वाळुंज, सचिव मनिष बोरा, खजिनदार अमितकुमार टाकळकर, माजी अध्यक्ष मिलींद आहेर व कुणाल रावळ यांच्यासह नितीन दोंदेकर, रमेश बोऱ्हाडे, सदाशिव आमराळे आदी क्लब सदस्य व पत्रकार उपस्थित होते.

कोरोना महामारी कालावधीत पत्रकारांनी प्रशासनास व नागरिकांना सहाय्य केले. पत्रकारितेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या गैरसोयीबद्दल आवाज उठवुन व वेळोवेळी शासनास सूचना करून कोरोना रुग्णास उपचार व सुविधा मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. पत्रकारांच्या या कामाची दखल घेऊन लायन्स क्लबच्या वतीने पत्रकार राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, तुकाराम बोंबले, राजेंद्र मांजरे, रामचंद्र सोनवणे, किरण खुडे, ऍड. निलेश आंधळे, सुनील थिगळे, रोहिदास गाडगे, अक्षता कान्हूरकर या पत्रकारांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष वाळुंज यांनी मागील पाच वर्षातील क्लबने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विभागीय अध्यक्ष प्रकाश मुटके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात सत्य दडपून न टाकता पुढे आणतात व समाजाचे प्रबोधन करतात. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचे व लायन्स क्लबचे मित्रत्वाचे नाते आहे. पत्रकारांच्या वतीने कोंडीभाऊ पाचारणे यांनी मनोगत व्यक्त करून वर्धापनदिनास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमितकुमार टाकळकर यांनी केले तर आभार मिलिंद आहेर यांनी व्यक्त केले.

Previous articleपवनाधरण परिसरात पर्यटकांचा महापूर, वींकेंड बंदीचा उडाला पूर्ता फज्जा
Next articleमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी छाया गोणते यांची निवड