सेझबाधित शेतकऱ्यांना मिळणार पंधरा टक्के परतावा

खेड – तालुक्यातील पुर्व भागातील एसईझेडबाधित शेतकऱ्यांना त्यांचा प्रलंबित 15 टक्के परतावा मिळण्यासाठी तोडगा निघाला असून लवकरच त्याचा मोबदला बाधितांना मिळणार असल्याची माहिती शेतकरी संचालक समितीच्या सदस्यांनी दिली.

‘एसईझेड’साठी सन 2008 मध्ये दावडी,निमगाव, गोसासी, कनेरसर ,केंदूर या गावातील 1207 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते . यावेळी दिलेल्या विशेष पॅकेजमध्ये विकसित जमिनीच्या स्वरूपात 15 टक्के परतावा बाधितांना देण्याचे ठरले होते. त्यानंतर सन 2009 मध्ये ‘केईआयपीएल’ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची खेड डेव्हलपर्स (केडीएल) नावाची कंपनी स्थापन केली. नियोजित स्वरूपातील जमीन परताव्याऐवजी जमिनीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेअर्स देण्यात आले. मात्र, ठरल्याप्रमाणे कंपनीची उभारणी व कामकाज अमलात आले नाही. त्यामुळे बाधित शेतकरी पुन्हा शेअर्सऐवजी विकसित जमीन मागू लागले. त्यावर तोडगा निघत नसल्याने अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.

राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून शासनाने 23 कोटी मुद्रांक माफ केले व केंद्र सरकारने 6 कोटी जीएसटी माफ केला.सेझ बाधित शेतकऱ्यांची एकजूट आणि त्यांना मिळालेल्या राजू शेट्टी यांच्या साथीमुळे शेतकऱ्यांना अखेर त्यांचा 15 टक्के परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

सेझ’बाधित शेतकऱ्यांना परताव्याची जमीन मिळावी आणि ती विकली जावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे शेतकरी संचालक
समितीचे प्रतिनिधी सतत पाठपुरावा करीत होते.शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एसईझेड ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्राही काढण्यात आली होती. तसेच पुण्यातील कल्याणी ग्रुप व एमआयडीसी कार्यालया पुढे धरणे आंदोलन करण्यात आले होते.तसेच संबंधित अधिकारी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तीन वेळा आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर दोन वेळा बैठका घेतल्या आल्या होत्या

श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना लवकरच त्वरित 15 टक्के परतावा मिळणार आहे, याची कुणकुण लागल्याच काही संधीसाधू लोकं इतर पक्ष व संघटनांसोबत पत्रव्यवहार करून त्यांची पत्रे घेऊन माध्यमांना खोटी माहिती देऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा बुरखा पांघरलेले मूठभर लोक करीत आहे. त्यांचे उद्योग थांबले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संचालक समिती व केडीएलने दिला आहे.

मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजू शेट्टी, खेड डेव्हलपर्सचे संचालक चंद्रकांत भालेकर, रमेश दौंडकर, संतोष शिंदे, काशिनाथ दौंडकर, विष्णू दौंडकर, मारुती गोरडे, राहुल सातपुते, मारुती सुक्रे, धोंडिबा साकोरे यांनी भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Previous articleज्योतिष शास्त्रातील दानशूर मान्यवरांच्या हस्ते सुरेखा ताईंचा वाढदिवसानिमित्त सत्कार
Next articleपुरंदरच्या अंजिराला जगभरात किंमत : अंजिराला भौगोलिक मानांकन