वारीच्या वाटेवरील गावांची निराशा

अमोल भोसले,हडपसर

आषाढी वारी सुरू झाली की उभा महराष्ट्र भक्तीरसात चिंब नाहताना अनुभवास येत असतो. विशेषतः वारिच्या वाटेवरील गावांमधील उत्साह आणि भक्तीमय वातावरण डोळ्यांत साठवण्यासारखे असते. मात्र, दरवर्षी लाखो भाविकांच्या सहवासाने टाळ मृदंगाच्या तालावर आपल्या गावातून डोलत जाणारा पालखी सोहळा सलग दुसऱ्याही वर्षी खंडीत झाल्याने ग्रामस्थांची निराशा झाली आहे.

पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य एकादशीला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत असतात. सकाळी हडपसर पर्यंतचा प्रवास करतात. येथे दोन्हीही पालख्या विसावा घेऊन पुढील मुक्कामाच्या मार्गाने प्रस्थान ठेवत असतात. महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांना येथे निरोप दिला जातो. मात्र, या उत्सवाची तयारी येथे पंधरा दिवस आगोदरपासून सुरू झालेली असते.

विसावा स्मारकाची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, रांगोळी, फुलांची आरास, परिसर सुशोभीकरण, दर्शन रांगा अशी तयारी येथे होत असते. अनेक व्यक्ती, राजकीय अराजकीय संस्था, संघटना, गणेश मंडळे, व्यापारी यांच्याकडून भाविकांच्या स्वागत व सेवेसाठी अन्नदान, आरोग्य शिबिरांसह विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जात असतात. आसपासच्या गावातील हजारो नागरिक या ठिकाणी पालखी दर्शन व वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. हजारो फेरीवाल्यांना त्यानिमित्ताने व्यवसाय प्राप्त होत असतो. अनेक दिंड्यांना येथे काही व्यक्ती व मंडळांकडून आदल्या दिवशीच निमंत्रित केले जाते. त्यांच्या रात्री व पुन्हा सकाळी भजन किर्तनाने परिसर भक्तीने दुमदुमून जात असतो. स्थानिक कीर्तनकार, प्रवचनकार व भजनी मंडळेही या उत्सवात सहभागी होत असतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली दोन वर्षांपासून सरकारने पायी वारी सोहळा बंद केला आहे. त्यामुळे सोहळ्याच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या वारीच्या वाटेवरील गावांगावात निराशा पसरली आहे. मुक्कामाच्या गावांमध्येही असेच निराशेचे वातावरण तयार झाले असून संतभेटीची ओढ लागलेल्या नागरिकांना काहीतरी हरवल्याचा अनुभव येत आहे.

Previous articleहडपसर येथे पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक स्वागत
Next articleदत्तात्रय नाईकडे गुरुजी यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार