महिला वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला सोडले निसर्गाच्या अधिवासात

नारायणगाव (किरण वाजगे

पुर्ण वाढ झालेला बिबट्या पिंजऱ्यात अडकण्या ऐवजी सहा ते सात महिने वयाचा बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकल्याने त्याला पुन्हा त्याच्या अधिवासात सोडण्याची किमया जुन्नर वन विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.बिबट्या, बिबट किंवा बिबळ्या वाघ हा प्राणी उत्तर पुणे जिल्ह्यात नवीन नाही किंवा येथील नागरिकांना बिबट्या बरोबर राहण्याची आता सवय देखील झाली आहे.

परंतु बिबट्या विहिरीत पडल्यानंतर किंवा तो जखमी झाल्यानंतर त्याला रेस्क्यू करणे, त्याच्यावर उपचार करणे तसेच पिंजऱ्यात अडकल्यानंतर पुढील सोपस्कार करणे या सर्व बाबी अनेक वेळा वन विभागाचे पुरुष अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी करत असतात. मात्र रविवारी वनपाल मनीषा काळे, वनरक्षक मनीषा बनसोडे व वनरक्षक भाग्यश्री टोणपे यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे.
वय कमी असलेला अवघ्या सहा ते सात महिन्याचा बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याच्या सोबत असणारी त्याची आई सैरभैर होऊ नये म्हणून त्या बछड्याला पुन्हा त्याच ठिकाणी निसर्गाच्या अधिवासात सोडून देण्यात येते.


याच अनुषंगाने वरील तिघी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक जयरामे गौडा, वनक्षेत्रपाल अजित शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या बछड्याला निसर्गात मुक्त केले.

येथील वनरक्षक भाग्यश्री टोणपे या पिंजऱ्या वर उभ्या राहिल्या तर वनपाल मनीषा काळे व वनरक्षक मनीषा बनसोडे यांनी पिंजऱ्याच्या मागे उभे राहून त्याला पिंजऱ्याच्या पुढील बाजूकडे हूसकावून लावत आपल्या कॅमेरात कैद केले.

ही घटना जुन्नर तालुक्याच्या चिंचोली व पारुंडे गावच्या हद्दीवर जयसिंग राजू पवार यांच्या शेतामध्ये रविवारी दि. ४ रोजी घडली. यावेळी वनमजूर बाळसराफ, ग्रामस्थ मयूर दशरथ पवार व गणेश रामचंद्र काशीद यांनी सहकार्य केले.

Previous articleकारची मोटर सायकलला धडक पित्याचा जागीच मृत्यू ठार ; पाच वर्षाची मुलगी जखमी
Next articleओटर कंट्रोल इंडिया कंपनी कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना मोफत लसीकरण