संस्थाचालक शिक्षण मंडळाकडून शिक्षण आयुक्तांना मागण्यांचे निवेदन

राजगुरूनगर-संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण यांच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी (IAS)यांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील १२०० पदे भरण्याची जाहिरात फेब्रुवारी 2019 मध्ये आली होती. त्यानुसार गुणवत्तेप्रमाणे जागा भरण्यास मान्यता दिलेल्या शिक्षण संस्था, नगरपालिका व महानगरपालिकांना एका जागेसाठी दहा याप्रमाणे सुमारे सहा हजार उमेदवार दिले आहेत. उर्वरित शिक्षण संस्थांना लवकरच गुणवत्तेप्रमाणे उमेदवार भरण्याची परवानगी दिली जाईल असे चर्चेदरम्यान शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.

20 टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांचे मूल्यांकन झालेले आहे. त्यांचे अनुदान लवकरच वितरित केले जाईल याशिवाय नव्याने मूल्यांकन करावयाच्या शाळांचे मूल्यांकन करून पात्र शाळांना अनुदान दिले जाईल. शाळांना दिले जाणारे वेतनेतर अनुदान कोरोनाच्या महामारी मुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने थांबविण्यात आले आहे. हे अनुदानही परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच दिले जाईल. यावर्षीची संच मान्यता लवकरच करून कार्यरत पदानुसार शिक्षक मान्यता देण्यात येतील असेही सोळंकी यांनी सांगितले.

आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीस माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, दत्तात्रय जगताप व उपसंचालक , श्रीमती वंदना वाहुळ उपस्थित होते. शिष्टमंडळात संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, उपाध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील ,सतीशमामा खोमणे, खजिनदार श्रीप्रकाश बोरा, सहसचिव महेश ढमढेरे, कल्याणराव जाधव, आप्पा बालवडकर, राजीव जगताप, राजेंद्र भोसले उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात पुन्हा एकदा नेपाळी सुरक्षा रक्षकाकडून घरफोडी : ३० तोळे सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबर रोख रक्कम लंपास
Next articleमावळची सुवर्ण कन्या तृप्ती निंबळे यांच्या वाढदिवसांचा अनाठाई खर्च टाळून आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप