ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची पोलखोल

चाकण- श्री क्षेत्र महाळुंगे (ता.खेड) येथे तळ्याच्या पडलेल्या संरक्षण भिंतीचे सुरू असलेले काम संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत दर्जाहिन पद्धतीने सुरु असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी हे काम रोखले आहे . दरम्यान , दर्जेदार काम करण्याबाबत वारंवार सूचना करुनही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे .


श्रीक्षेत्र महाळुंगे येथील गावातील स्मशानभूमी येथील तळ्याची संरक्षण भिंत अतिवृष्टी व इतर कारणामुळे पडली होती. तळ्याशेजारी स्मशानभूमीत विधी होत असतात त्याठिकाणी नागरिकांची नेहमी ये जा असते.
ती भिंत अतिशय खराब पद्धतीने पडली होती त्यामुळे त्यामध्ये माती तळ्यात ढासळत होती एकंदरीत तळ्याची चांगलीच दुर्दशा झाली होती.

त्यामुळे नुकतेच सदरच्या तळ्याचे काम ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मंजूर करून पंचायत समितीच्या योजनेतून सुरू करण्यात आले होते.

विशेष म्हणजे या तळ्याचे काम करत असलेल्या ठेकेदाराला वारंवार ग्रामस्थांनी सूचना करूनही अंदाज पत्रकाप्रमाणे काम करत नाही.या तळ्याच्या कामासाठी निकृष्ट पद्धतीच्या ग्रीडचा वापर करण्यात आला आहे . तसेच सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने कामाची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून येत असून मुरुमीकरण व सोलिंग इत्यादी बांधकाम संदर्भात काम करत असताना तळ्याच्या बाजूला असलेल्या मातीमिश्रीत मुरमाचा वापर या ठिकाणी होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले . ही बाब सतर्क ग्रामस्थांनी ठेकेदार तसेच अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली. तरीसुद्धा सदर काम अधिकारी व ठेकेदार या दोघांच्या संगनमताने तळ्याच्या भिंतीचे काम रेटून नेत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन तळ्याचे काम बंद पाडले . यावेळी महाळुंगे येथील आजी – माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली की सदरील कामाचे मूल्यकांन व वास्तव काम यात खूप मोठी तफावत दिसून येत आहे तरी या कामाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी व्हावी व दोषी असलेल्या व्यक्तींवर ठोस कारवाई व्हावी.

Previous articleआस्था फाउंडेशनच्या वतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
Next articleटेकवडी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखड्डे आणि वृक्ष संवर्धन उपक्रमाची लोकसहभागातून सुरुवात