सोरतापवाडीमध्ये कृषी संजीवनी सप्ताह साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली मधील सोरतापवाडी येथील प्रगतिशील शेतकरी तथा डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास पंढरीनाथ चौधरी यांच्या शेतात मध्ये शिवार फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी ऊस व डाळिंब पिकामध्ये केलेले निरनिराळे आधुनिक प्रयोग व त्यांचे परिणाम याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यांनी एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. जागतिक दर्जाची वसंतदादा शुगर इ्स्टिट्यूट आपल्या नजिक असल्याने तेथील आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घेण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी तेथे वारंवार भेटी द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. ऊस पाचट न जाळता ते जिवाणूंच्या माध्यमातून कुजवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा अट्टाहास सर्व शेतकरी बंधूंनी केला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.

शिवार फेरी नंतर ग्रामपंचायत कार्यालय सोरतापवाडी येथे विद्यमान सरपंच संध्याताई अमित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जमीन सुपीकता निर्देशांक चर्चासत्र संपन्न झाले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोहन गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया देवेंद्र चौधरी उपस्थित होते. तसेच युवा नेते तथा रोपवाटिका उद्योजक अमित चौधरी, प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब रघुनाथ चौधरी, विजय चोरघे, सचिन रामभाऊ चौधरी, नंदकुमार चौधरी, युवा उद्योजक अजिंक्य चौधरी उपस्थित होते.

यावेळी हडपसर विभागाचे मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे निराकरण केले. कृषी सहाय्यक महेश भोसेकर यांनी गावाच्या सुपीकता निर्देशांक बद्दल माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर यांनी खतांच्या सुयोग्य वापराबद्दल माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांनी ऊस पिकाच्या शास्त्रोक्त पद्धतीने उत्पन्न वाढीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी रंगनाथआप्पा कड यांनी सोरतापवाडी गावाच्या फुलाशेतीचा इतिहास सांगितला व तरुण पिढीने गट शेतीच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरावी असे आवाहन केले.

रामदास पंढरीनाथ चौधरी यांनी शेतीचे अर्थकारण समजावून सांगताना उत्पन्न वाढीकडे सर्वांनी लक्ष द्यावे व बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेतीमध्ये काळानुरूप योग्य बदल करावे असे आवाहन केले. यानंतर विद्यमान सरपंच संध्याताई अमित चौधरी यांचा ऊती संवर्धन प्रयोगशाळा सारख्या तांत्रिकदृष्ट्या अवघड उद्योगाचे महिला उद्योजिका मार्फत यशस्वी पणे राबविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. तसेच राणीताई संतोष शितोळे यांचा रोपवाटिका व्यवसाय यशस्वी रित्या हाताळल्याबद्दल यशस्वी महिला उद्योजिका म्हणून सत्कार करण्यात आला.

सरपंच संध्याताई अमित चौधरी यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उति संवर्धन प्रयोगशाळा बद्दल माहिती देऊन अधिकाधिक महिला उद्योजकांनी पुढे येऊन प्रगती साधावी असे आवाहन केले तसेच ग्रामपंचायत मार्फत सर्व शासकीय योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

ग्रामपंचायत सदस्य शंकर कड यांनी सूत्रसंचालन केले तर कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Previous articleबजरंग दलाच्या वतीने ऑनलाइन शिवराज्यभिषेक सोहळा साजरा
Next articleहवेली- अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई