बजरंग दलाच्या वतीने ऑनलाइन शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

राजगुरूनगर- विश्व हिंदू परिषद बजरंग दल, खेड प्रखंड व दुर्गा वाहिनी दरवर्षी रायगडावर जाऊन शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु मागील वर्षी लॉकडाऊन असल्याने त्यावर मर्यादा आली. या वर्षीचीही परिस्थिती लक्षात घेऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत किल्ले रायगडी न जाण्याचे ठरवले. त्यामुळे बजरंग दल, खेड प्रखंडातील “शिरोली शाखा, बजरंग दल” व दुर्गा वाहिनी यांनी शिवचरित्रावरील प्रसंग स्वरूपात सादर करण्याचे ठरवले. परंतु सामाजिक अंतर राखण्यासाठी हा कार्यक्रम “कृष्णपिंगाक्ष” ह्या निसर्गरम्य टेकडीवरील कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थित घेतला.

या कार्यक्रमात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व दुर्गा वाहिनीच्या रणरागिनींनी शिवचरित्रातील अनेक घटना अभिनयातून हुबेहुब सादर केल्या. यात गड-किल्ले संवर्धन, व्यसनमुक्ती अशा मौलिक विषयांवर भाष्यही करण्यात आले. ह्यासोबतच सध्याची तरुण पिढी गावागावातील राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधून स्वतःला कशी गुलामगिरीत ढकलून देत आहे.यावरील नाटुकल तर विशेष आकर्षण ठरले. ह्या सर्व सादरीकरणात मार्मिक संवादासोबत, आकर्षक वेशभूषा आणि मनमोहक नृत्य याचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी लोहाट बंधू चमूने अवघ्या आठवड्याभराची तयार केली होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा कु. वैभवीताई सावंत यांनी केले तर पेटीवादन बंटीभाऊ मलघे, ढोलकीवादक अमोल उमाप, टाळकरी संतोष टाकळकर यांनी वाद्यवृंदात साथ दिली.

हा कार्यक्रम सामाजिक अंतर राखत, कोरोना नियमांचे पालन करत सादर केल्यामुळे याला प्रेक्षक मोजके होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामभाऊ सावंत, ह.भ.प. चैतन्यमहाराज वाडेकर, प्रसिद्ध वकील निलेश आंधळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या समारोपवेळी बजरंग दल जेष्ठ कार्यकर्ते विशाल (आबा) टाकळकर यांनी विश्व हिंदू परिषद कार्यपद्धती, रचना तसेच सेवाकार्य यांची माहिती देऊन तरुणांना संघटनात्मक कामात ऊर्जा खर्च करण्याचे आवाहन केले.संपूर्ण सोहळा सोशल मीडिया द्वारे ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आला.

Previous articleमलठण येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
Next articleसोरतापवाडीमध्ये कृषी संजीवनी सप्ताह साजरा