योगा व ध्यानधारणेमुळे आत्मिक समाधान -डॉ. मुकुंदराव ढिले

नारायणगाव (किरण वाजगे)

योगा व ध्यानधारणेमुळे ताण, तणाव, भिती आदींचे निर्मूलन होते. यामुळे आरोग्या बरोबर आत्मिक समाधान मिळते असे प्रतिपादन ज्येष्ठ योगा अभ्यासक व निसर्ग उपचार तज्ञ डॉ मुकुंदराव ढिले यांनी केले.

मुळशी तालुक्यातील नांदेड येथे आयोजित ध्यानधारणा शिबिरात डॉक्टर ढिले बोलत होते.
योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे मानली जातात. यातील ध्यानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ध्यान केल्याने आपल्याला मन:शांती, आनंद, सुदृढ आरोग्य, उत्तम रोग प्रतिकारशक्ती, सुधारित नातेसंबंध आणि परिपूर्ण जीवन हे सर्व फायदे सुलभ होतात.

आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये ध्यान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्यास जीवनाचा शाश्वत आनंद आपल्यापासून दूर नाही.
याच शाश्वत आनंदाच्या शोधाचा प्रवास अधिक सुलभ होण्याच्या हेतूने मुळशी तालुक्‍यातील नांदे येथील उद्योजक बाळासाहेब रानवडे यांच्या चैतन्य धाम आश्रमामध्ये उद्योगपती आलोक कदम यांच्या संयोजनांने नुकतेच योगशास्त्र व ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ योग अभ्यासक तसेच निसर्गोपचार तज्ञ तथा वास्तुतज्ञ डॉ मुकुंदराव ढिले यांनी योगशास्त्राचे तसेच ध्यान-धारणे चे महत्व सांगितले. संगीताच्या लयबद्ध व सुमधुर ध्वनींमधून आणि वेगवेगळ्या ताल वाद्यांवर आधारित मेडिटेशन द्वारे उपस्थितांना आनंददायी अनुभूतीची प्रचीती दिली.

या कार्यक्रमासाठी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त अजय कदम उद्योजक बाळासाहेब रानवडे, उद्योगपती तथा बांधकाम व्यवसायिक आलोक कदम, किरण वाजगे, गणेश अभिमाने, अमित घोडसाड, साहुज्जा रानवडे, जयश्री घोरपडे, स्नेहा पवार, श्री लोणकर, संदेश आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleगोरखगडावर फडकाविला तिरंगा “द फ्लाइंग सिख” मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
Next articleपंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा