गोरखगडावर फडकाविला तिरंगा “द फ्लाइंग सिख” मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

राजगुरूनगर-सह्याद्री खोऱ्यातील गड किल्ल्यांमध्ये सर करायला आव्हानात्मक असणारा गोरखगड टीम फोर्ट ऍडव्हेंचर्स च्या मार्गदर्शनाखाली सर करीत राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित, पद्मश्री पुरस्कार विजेते भारताचे महान धावपटू “द फ्लाइंग सिख” मिल्खा सिंग यांना गड माथ्यावर श्रद्धांजली वाहत केलेली ही साहसी मोहीम कोवीड योद्ध्यांना समर्पित केली.

गोरखगड हा घनदाट जंगलात हजारो वर्षे अभेद्य उभा असलेला, दिसायला रांगडा, खाली आ वासून उभी असलेल्या खोल दरीतच उघडणारे कातळ कडे व त्या कातळ कड्यावर कोरलेल्या दगडांच्या वळणाच्या अवघड पायऱ्यांमुळे सर करायला आव्हानात्मक मानला जातो.

या मोहीमची सुरवात देहरी गाव(ता मुरबाड, जि ठाणे) येथून झाली. देहरी गावातून समोरच दोन सूळके दिसतात, डाव्या बाजूचा लहान सूळका मछिंद्रगड तर उजव्या बाजूचा मोठा सूळका गोरखगड. प्राचीन शैलीत बांधलेल्या सुंदर प्रवेशद्वारातुन आतमध्ये येताच विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागेच गडाची पाऊलवाट सुरु होते.

पहिला टप्पा हा घनदाट जंगलातून, पाण्याच्या प्रवहाने तयार झालेल्या खोल पण अरुंद पायवाटेच्या खड्या चढाईचा आहे. तर दुसरा टप्पा हा विरळ जंगलातून काळभैरवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जातो. तिसरा टप्पा हा खडकात कोरलेल्या पायऱ्या मार्गे वरती जातो.

कातळात चढाई चा खरा थरार आहे. १०० फूट चढाई केल्यावर गडाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या टप्यात खोल दरी आहे. प्रवेशद्वार पार केल्यावर गडाच्या आतून कोरलेला २० फूटी टप्पा आहे. पुढे दोन शिलालेख असलेल्या पायऱ्यांमार्गे पुढे गेल्यावर मोठी गुहा आहे. पुढे शेवटचा १५० फूटी सर्वाधिक कठीण टप्प्यात काळजाचे ठोके चूकतात. कारण जोरदार पावसामुळे निसरडीपणा असलेल्या पायऱ्या आव्हानात्मक आहे. परंतु पायऱ्यांवर असलेल्या खोमण्यांमध्ये हातांच्या बोटाची मजबूत पकड करून, एक एक पाऊल पुढे टाकावे लागते.
अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात डॉ. समीर भिसे, पुरुषोत्तम राऊत, सचिन पुरी, अक्षय भोगाडे, संदीप राऊत, उषा होले, सुहास पाटील, भागेश जाधव, रवी कुंभार, दिप्ती येंध्ये, दिपक साळुंखे, अमर माने, गणेश चव्हाण, अश्विनी साकोरे, ऐश्वर्या लगड, सार्थक येंध्ये आणि आराध्या येंध्ये(८ वर्षे) या गिर्यारोहकांनी गडाचा माथा गाठत महादेवाच्या मंदिरा समोर नतमस्तक होत, अभिमानाने तिरंगा फडकावित, मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Previous articleदेऊळगाव राजे येथे जनावरांचे रक्त तपासणी केंद्र सुरू करा- अभिमन्यू गिरमकर
Next articleयोगा व ध्यानधारणेमुळे आत्मिक समाधान -डॉ. मुकुंदराव ढिले