पाठीमागून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील आई , वडील व मुलाचा जागीच मृत्यू

नारायणगाव (किरण वाजगे)

पुणे नाशिक महामार्गावर १४ नंबर (कांदळी’ ता.जुन्नर) हद्दीतील शँम्पेन कंपनीच्या समोर मागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आई वडील यांच्यासह मुलगा जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार (दि. १८) रोजी सायंकाळी घडली.

राजेश निवृत्ती लेंडे (वय ४०) सुरेखा राजेश लेंडे (३५) व यश राजेश लेंडे (१५, सर्व रा. पिंपळवंडी “भटकळवाडी”, ता. जुन्नर) यांचा अपघातात मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की राजेश लेंडे हे आपल्या पुतणीच्या विवाहनिमित्त आपली पत्नी व मुलासह कपडे खरेदी करण्यासाठी नारायणगाव येथे गेले होते. खरेदी झाल्यानंतर परतत असताना १४ नंबर हद्दीतील शँपेन कंपनी च्या समोरील मॉल जवळ मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एम. एच. १४ जे.एच. २२०६) जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

वारूळवाडी येथील कारचालक विशाल विलास कुलकर्णी याच्यावर तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने भा.द.वि. कलम ३०४ (अ) २७९,३३७,३३८,४२७, मोटर व्हेईकल कायदा कलम १८४, १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

Previous articleसासवड – उरुळी कांचन बससेवा होणार सुरु: आण्णा महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
Next articleलोणी काळभोरला हातभट्टयांवर छापा