विद्युत रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

विद्युत रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला लोणीकंद पोलिसांनी लोणी कंद (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आळंदी रस्त्याच्या परिसरात गुरुवारच्या रात्री अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. तर तांब्याच्या तारांची खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदारास दत्तनगर (कात्रज) परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या ७०० किलोग्राम वजनाच्या तांब्याच्या तारा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मुकेश प्रल्हाद पटेल, अली तसव्वर खान, अल्ताफ अन्वर अली, हरिगोबिंद तुळशीराम चौधरी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर धिरज अशोक जैन असे अटक करण्यात आलेल्या भंगार दुकानदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी कंद, रायगड आणि सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विद्युत रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी
मोठ्या प्रमाणात होत होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिसांना सुचना दिल्या होत्या.

लोणी कंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे यांना तांब्याच्या तारांची चोरी करणारे चार आरोपी लोणीकंद पावर हाऊस जवळील आळंदी रस्त्यावर असलेल्या रोहीत्राजवळ थांबले असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, वरील चार आरोपी रोहीत्राजवळ संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या दोन मोटारसायकलला बांधलेल्या ठिक्यांमध्ये हातोडे, छन्नी, स्क्रू ड्रायव्हर, एक्सा ब्लेड, कटर आणि विविध स्पॅनर असे मोठ्या प्रमाणावर साहित्य दिसुन आले.

पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी करीत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. तसेच त्यांनी दत्तनगर (कात्रज) येथील धिरज जैन यांच्या भंगार दुकानदार विकत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून सुमारे पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या ७०० किलोग्राम वजनाच्या तांब्याच्या तारा जप्त करून भंगार दुकानदार धिरज जैन यांना लोणी कंद पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, आरोपी मुकेश पटेल, अली खान, अल्ताफ अली आणि हरिगोबिंद चौधरी यांची टोळी रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी करीत होती. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कोलवडी, बकोरी, फुलगाव आणि परिसरातील गावांमधून तांब्याच्या ताराचे ७ गुन्हे, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ०२ गुन्हे आणि सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ०१ गुन्हा असे एकुण १० गुन्हे केले असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आणि पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, सहाय्यक फौजदार मोहन वाळके, कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, समीर पिलाणे, सागर कडु आणि बाळासाहेब तनपुरे यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जुन्नरच्या आदिवासी भागातील दऱ्यावाडी येथे पोहचली वीज
Next articleइरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोलिस बांधवांना मदत