वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं..खासदार डॉ अमोल कोल्हे

अमोल भोसले, पुणे

भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे. तिला ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १’ हा दुर्मिळ आजार झाला. त्यानंतर या आजारावरील ‘झोलगेन्स्मा’ या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला. प्रसार माध्यमे आणि समाजमाध्यमांतून ही बातमी समजल्यानंतर दानशूर व्यक्ती, संस्थांकडून आर्थिक मदत मिळाली. क्राऊड फंडीगमध्ये १६ कोटी रुपये जमा झाले.

परंतु परदेशातून हे इंजेक्शन आणतेवेळी त्या इंजेक्शनच्या मूळ किमतीवर ६ कोटींचा आयात शुल्क आकारण्यात आला. सौरभ शिंदे यांनी माजी आमदार विलास लांडे आणि संकेत भोंडवे यांच्या माध्यमातून आयात शुल्क माफी संदर्भात विनंती केली. तत्पूर्वी संसदेच्या अधिवेशनात वेदिका शिंदे हिचा उल्लेख करत या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार करून व संपर्क साधून ६ कोटी रुपये आयात शुल्क माफीचा निर्णय मंजूर करून घेतला. निरंतर पाठपुराव्याला अखेर यश मिळाले अशी माहिती खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.

आज ते १६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं. वेदिकासाठी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे तसेच ज्या ज्ञात आणि अज्ञात लोकांनी मदतीचा हात दिला, प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले पाहीजे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. वेदिकाच्या आई वडिलांच्या जिद्दीला मानाचा मुजरा आणि वेदिकाला भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. वेदिका हिला उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना.

Previous articleराजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त डब्बेवाल्यांना किराणा किटचे वाटप
Next articleखूनाच्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेडया