दीड वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या:चार जणांना अटक

नारायणगाव ( किरण वाजगे)

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, दीर, सासू व सासरा अशा चार जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला.

हिवरे तर्फे नारायणगाव( ता. जुन्नर) येथील विवाहीतेने दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वंशाला दिवा पाहिजे म्हणून दुसऱ्या लग्नास विरोध केल्याने या विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहीतेचा पती,दीर, सासू व सासरा आशा चार जणांना अटक केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी विवाहीतेचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरा बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे यांना अटक केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की ढवळपुरी( ता. पारनेर) येथील बुधा ठवरे यांची कन्या रंजना हीचा विवाह १५ एप्रिल २००९ रोजी हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी शिवारातील अविनाश तांबे याच्याशी झाला होता. त्यांना सुप्रिया(वय ४),श्रीशा( वय दीड वर्ष) या दोन मुली झाल्या होत्या. वारसदार व वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे यासाठी अविनाश याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.दुसऱ्या लग्नास परवानगी द्यावी यासाठी अविनाश याने रंजना हिच्याकडून जबरदस्तीने करारानामा लिहून घेतला होता. मात्र दुसऱ्या लग्नास पत्नी रंजना व तिचे वडील बुधा ठवरे यांचा विरोध होता. रंजना हिला दोन मुली असल्याने व विवाहास विरोध करत असल्याने आरोपी रंजना हिचा शारीरिक, मानसिक छळ करत होते. या बाबतची माहिती रंजना हिने वडील बुधा ठवरे यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी मोबाईल द्वारे दिली होती. या मुळे अविनाश याने पत्नी रंजना हीचा मोबाईल फोडला होता .८ जून रोजी आरोपींनी रंजना हिला मारहाण केली होती. सततच्या छळाला कंटाळून व पतीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रंजना हिने ९ जून २०२१ रोजी सायंकाळी हिवरे तर्फे नारायणगाव येथील शिवहरीनगर शिवारातील पोपट घुले यांच्या विहीरीत दीड वर्षाची मुलगी श्रीशा हिच्यासह उडी मारून आत्महत्या केली. या बाबतची फिर्याद बुधा ठवरे
यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.

नारायणगाव पोलिसांनी आरोपींना अटक करून शुक्रवार दिनांक ११ रोजी दुपारी जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रंजना हिच्या नातेवाईकांनी अविनाश तांबे याच्या घरा समोरच अंत्यविधी केला.

Previous articleदौंड तालुक्यात कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांची मागणी
Next articleवाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावर असणारे अपघाती वळण दुरुस्त करून ‘सरळ’‌ करण्याची मागणी