पत्रकार बांधवांनी बातमीदारी बरोबरचं सामाजिक बांधिलकी जपून समाजहिताचे उपक्रम राबवावेत – पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी

लोणी काळभोर परिसरात महामार्गालगत वाढून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या झुडपांची हवेली तालुका पत्रकार संघ व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली साफसफाई

गणेश सातव,वाघोली

फक्त बातमी देऊन इतरांच्या चुका काढणे एवढेच पत्रकारांचे काम नसून सामाजिक बांधिलकी मानून समाजोपयोगी कामेही पत्रकारांनी करावीत. या भावनेतून समाजोपयोगी कामे केल्याबद्दल हवेली तालुका पत्रकार संघ कौतुकास पात्र आहे असे मत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी व्यक्त केले आहे.

 

  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. लोणी काळभोर ते कवडीपाट टोलनाका या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे तोडण्यात आली. तसेच मधुबन मंगल कार्यालयात गरजूंना मोफत कपडे वाटण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी बोलत होते.

 

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, हवेली पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे प्रभाकर क्षीरसागर, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, त्यांचे सर्व सहकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, डाॅ अभय नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

  पुणे सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला अनेक झाडे, झुडपे, काटेरी बाभळी उगवल्या आहेत. दुचाकी,चारचाकी वाहन चालवताना वाहनचालकांना या झुडपांचा त्रास होत आहे.

या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तसेच काटेरी फांद्याचा फटका प्रवाशांना बसत असतो. ही झुडपे तोडण्यात यावीत, अशी मागणी अनेकांनी केली आहे. परंतु हे काम हवेली तालुका पत्रकार संघाने केले म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी व्यक्त केले.

पुणे- सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा  काटेरी झुडपे आली होती. रस्ता व्यापला गेला आहे. महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना ही काटेरी झुडपे लागत असत. मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असताना बांधकाम विभागाने ती काढली नसल्याने प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाश्यांना इजा होत असुन लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक लहानमोठे अपघात झाले होते. यासाठी संबधित विभागाने तातडीने काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती आहे. परंतू त्याकडे दुर्लक्ष होत होतेे. कवडीपाट टोलनाका सुरु असताना टोल वसूल करणारी संबंधित कंपनी हि साफसफाई करत असे. परंतु आता टोल वसूली बंद झाली आहे. त्यामुळे हि कंपनी या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करत नाही. सदर रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. परंतु शासनाचे हे दोन्ही विभागांचे या रस्त्याकडे दूर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

सदर बाब लक्षात आलेनंतर हवेली तालुका पत्रकार संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ज्ञान गंगा शिक्षण प्रसारक मंडळ, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत, पूर्व हवेली डॉक्टर्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान करून कवडीपाट टोलनाका ते लोणी फाटा या दरम्यानच्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा असलेली झडुपे तोडण्यात आली. तसेच हवेली तालुका पत्रकार संघ, ज्ञान गंगा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने ६० गरजुंना पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते मोफत कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप सचिन महाराज माथेफोड यांनी तर उपस्थितांचे आभार राजेंद्र हजगुडे यांनी मानले.

Previous articleबोरिबेल शिंगाडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
Next articleबोरिबेल शिंगाडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ