रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

अमोल भोसले,उरुळी कांचन

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तीन चोरट्यांना पुणे शहर पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे २७९ किलो वजनाचे रक्तचंदनाच्या लाकडासह टेम्पो असा एकूण सुमारे ३२ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संजय साबळे (वय १९, रा. मोरे वस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली), रोहित रवी रुद्राप (वय २०, रा. कोंढवा, पुणे) आणि लेन कन्हैय्या वाघमारे (वय २५, रा. भैरोबानाथ मंदीरा जवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. ८) खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल पिलाने यांना रक्तचंदन लाकडाची तस्करी करुन ते विक्री करीता काही व्यक्ती लोणी काळभोर, हडपसर पुणे या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे-सोलापूर महामार्गावरील मधुबन लॉन्स येथे सापळा रचून महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक (एमएच २५ पी ४४१८) येताना दिसली. यावेळी गाडी थांबवून चालक साबळे व शेजारी बसलेल्या रुद्राप यांना ताब्यात घेऊन पाहणी केली असता, त्यांच्या गाडीमध्ये रक्तचंदनाची २७० किलो रक्तचंदनाचे ९ लाकडी ओंडके सुमारे २७ लाख ५० हजार रुपये किमतीचे, एक पिकअप आणि एक मोबाईल असा एकूण सुमारे ३२ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, संजय साबळे, रोहित रवी रुद्राप आणि लेन कन्हैय्या वाघमारे यांच्यावर भारतीय वन अधीनियम व महाराष्ट्र वन नियमावली कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार अशोक पवार हस्ते ध्वजारोहन
Next articleबिरसा ब्रिगेड खेड तर्फे डेहणे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न