५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह दोन माजी सरपंचावर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या दोन माजी महिला सरपंचां सह ग्रामसेवकावर ५० लाख रूपयांपेक्षा जास्त शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १ एप्रिल २०१५ ते १८ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये ५० लाख ८४ हजार ३४३ रुपये शासकीय रकमेचा आर्थिक गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र गेनभाऊ खराडे (रा. मंगरूळ तालुका जुन्नर, जिल्हा पुणे), तसेच तत्कालीन सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे व तत्कालीन सरपंच ज्योती प्रवीण दिवटे (दोघीही रा. नारायणगाव) यांच्यावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेची फिर्याद जुन्नर पंचायत समितीचे व्यवसाय विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी दिली आहे.
याप्रकरणी वरील आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर ११५/२०२१ अन्वये भा.द.वि. कलम ४२०,४०६, ४०९, ३४ यानुसार दिनांक ८ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगे पाटील करीत आहेत.

दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व तत्कालीन सरपंच ज्योती दिवटे या सध्या नारायणगाव चे विद्यमान सरपंच योगेश पाटे यांच्या पॅनल मधून निवडून आल्या आहेत. तर माजी सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे या चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या गटातून निवडून आल्या होत्या.दोन्ही महिला सरपंचांवर अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

Previous articleघोडेगाव येथे कल्याण मटका खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल
Next articleखेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान