घोडेगाव येथे कल्याण मटका खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

घोडेगाव (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत भवानीमाळ येथे कल्याण मटका जुगार खेळणाऱ्यांवर खेड उपविभागीय पोलिस अधिकारी व मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८७ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांवर मुंबई जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवार (दि.७ ) रोजी खेड विभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की घोडेगाव ता.आंबेगाव गावच्या हद्दीत भवानी माळ येथे शंकर बाबुराव कोकणे यांच्या जुन्नर रोडवरील बिल्डिंगमध्ये एका खोलीमध्ये तुकाराम नामदेव काळे कल्याण मटका नावाची जुगाराची साधने जवळ बाळगून कल्याण मटका चालवत असल्याची माहिती मिळाली.

 याबाबत श्री लंबाते यांनी या ठिकाणी छापा मारण्यासाठी पो. ह. राजेश मोहिते ,पो. ह. मुळूक यांना सांगून त्या साठी मंचर पोलीस ठाण्याकडून पोलीस सब इन्स्पेक्टर खबाले यांना मदतीसाठी घेऊन त्या ठिकाणी छापा मारण्यात सांगितले.त्यावेळी पो.ह. मुळूक यांनी २ पंचांना घेऊन सदर ठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी दत्तात्रेय परशुराम सांडभोर( वय ४२ ) तुकाराम नामदेव काळे ( वय ५० दोघेही रा. घोडेगाव ता. आंबेगाव ) निलेश गुलाब लांडगे ( वय २९ रा. पिंपळगाव घोडे ता.आंबेगाव जि. पुणे ) पंढरीनाथ बळीराम बारवे ( वय ५० रा. ता.आंबेगाव जि. पुणे ) शंकर धारकू डगळे ( वय ४७ रा. कोळवाडी घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे ) हे जुगार खेळत होते पोलिसांनी त्यांच्या जवळ रोख रक्कम ,मोबाईल असा एकूण ८७ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार राजेश मोहिते यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
Next article५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह दोन माजी सरपंचावर गुन्हा दाखल