आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला धामणे शाळेला स्लॅब

चाकण- निसर्ग वादळाने उद्ध्वस्त झालेल्या खेड तालुक्यातील धामणे जिल्हा परिषद शाळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार डाॅ.अमोल कोल्हे, आमदार दिलिप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, सदस्य शरद बुट्टेपाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अधिकार्‍यांसह उभ्या तालुक्याने भेटी देऊन हळहळ व्यक्त केली होती. तेव्हा आमदार दिलिपराव मोहितेपाटील म्हणाले होते, “शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी मी स्वत: सर्वतोपरी मदत करीन. शाळेला पुर्ववत पत्र्याचे छत केल्याने भविष्यात कधीकाळी वादळाचा धोका कायम राहण्यापेक्षा जिल्हा परिषदेकडील मंजूर १४.६२ लक्ष निधीतून स्टिल व मजूरी भागेल आणि कमी पडेल त्यासह संपुर्ण कामाच्या काॅन्क्रीटसाठी मी सर्व सहकार्य करीन.

धामणे शाळा पुर्ववत आणि भक्कम उभी करण्यासाठी मदतीचा दिलेला शब्द आमदार दिलिपराव मोहिते पाटील यांनी पुरेपुर पाळला. साधारण ४७०० स्क्वेअरफुट शालेय इमारतीच्या पायापासून ते स्लॅबपर्यंत लागणारी सगळी खडी, क्रश, सिमेंट आणि स्लॅबसाठी रेडीमिक्स काॅन्क्रीट RMC आमदार मोहितेपाटलांनी उपलब्ध करुन दिले. या सहकार्याने धामणेकर गावकरी भारावून गेले असल्याची भावना सरपंच महेंद्र कोळेकर, मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी व्यक्त केली.

ज्ञानमंदिरासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल धामणे गाव आमदार मोहिते पाटलांचे सदैव ऋणी असल्याचे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अंकुशराव कोळेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगिता कोळेकर यांनी सांगितले. स्लॅब भरावकामावेळी मोठ्या संख्येने गावकरी शालेय आवारात दिवसभर उपस्थित होते.